बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आज भारताची संघनिवड

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत ऋषभ पंतसह संजू सॅमसनची यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे.

कोहलीने २०१८पासून ५६ पैकी ४८ सामन्यांत (तिन्ही प्रकार मिळून) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे निवड समिती त्याला विश्रांती देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळेल. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या या मालिकेसाठीही भारतीय संघात समावेश करण्यात येणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.

त्याशिवाय जायबंदी अष्टपैलू हार्दिक पंडय़ाऐवजी मुंबईकर शिवम दुबेचाही समावेश केला जाऊ शकतो. उभय संघांतील ट्वेन्टी-२० मालिकेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकासुद्धा होणार आहे.