अफगाणिस्तानशी कसोटी टाळल्याबद्दल वेंगसरकर यांच्याकडून प्रशंसा

मुंबई : इंग्लंडमधील आव्हानात्मक मालिकेच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेटचा मार्ग स्वीकारून पुढील महिन्यात होणारी अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी टाळण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाची भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी प्रशंसा केली आहे.

इंग्लंडला त्यांच्या मैदानावर हरवण्यात भारत यशस्वी ठरेल, असा विश्वास लॉर्ड्स मैदानावर लागोपाठच्या दौऱ्यांमध्ये तीन शतके ठोकणारे एकमेव भारतीय फलंदाज वेंगसरकर यांनी व्यक्त केला आहे. दर्जेदार गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर भारत विजय मिळवू शकेल, असेही ११६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेंगसरकर यांनी म्हटले आहे.

विराटने कौंटी खेळण्यास प्राधान्य दिल्याच्या निर्णयाबाबत वेंगसरकर म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांत कोहलीने जगातील अव्वल फलंदाज म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्याच्याकडून खूप मोठय़ा अपेक्षा आहेत. इंग्लंडचा दौरा हा त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याने हा निर्णय घेतला असून तो नक्कीच चांगली कामगिरी करेल,’’ असा विश्वासदेखील वेंगसरकर यांनी व्यक्त केला.

‘‘मी जर निवड समितीत असतो तर चेतेश्वर पुजारालादेखील इंग्लंडमध्येच पाठवून कौंटी क्रिकेट खेळायला सांगितले असते. अशा खेळाडूंनी अफगाणिस्तानविरुद्ध भारतात एक कसोटी खेळण्यात काही फारसे तथ्य नाही. त्यापेक्षा इंग्लंडमध्येच कौंटी खेळून तिथूनच भारतीय संघाच्या चमूत सहभागी होणे योग्य ठरले असते,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुजारा इंग्लंडमध्ये अधिकाधिक कौंटी सामने खेळला असता तर त्या अनुभवाचा फायदा त्याला आणि भारतीय संघाकडून खेळताना संघालाच होणार आहे. भारताकडे गोलंदाजीतदेखील अनेक पर्याय असल्याने मला यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात यशाची आशा अधिक दिसत आहे. आपल्या जलदगती गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली असून भारतीय संघ समतोल दिसत असल्याने आपण इंग्लंडला हरवू,’’ असेही वेंगसरकर यांनी म्हटले आहे.