भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे(बीसीसीआय) ‘अ’ गटातील खेळाडूंचे वार्षिक मानधन पाच कोटी इतके करण्याची मागणी केली आहे. नुकतेच बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक मानधनात दुपटीने वाढ केली. पण त्यावरही कोहलीने आपली नाराजी व्यक्त करत बीसीसीआयकडे तित आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

बीसीसीआयने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी भारतीय खेळाडूंमध्ये ‘अ’ गटातील खेळाडूंचे वार्षिक मानधन १ कोटींवरून दोन कोटी केले. तर ‘ब’ गटातील खेळाडूंचे मानधन ५० लाखांवरून १ कोटी करण्यात आले. ‘क’ गटातील खेळाडूंना २५ लाख मिळणारे मानधन ५० लाख करण्यात आले. याशिवाय, सपोर्ट स्टाफचेही मानधन ५० लाख करण्यात आले होते. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळे यांनी बीसीसीआयने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या वेतन रचनेत पूर्णपणे बदल करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली. याशिवाय, खेळाडूंनीही बीसीसीआयकडून अजूनही आपल्याला अपेक्षित मानधन मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्याचे वृत्त क्रिकइन्फोने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता खुद्द विराट कोहलीनेच ‘अ’ गटातील खेळाडूंचे मानधन किमान ५ कोटी इतके असावे, अशी मागणी करून खेळाडूंमधील नाराजीच्या भावनेला वाचा फोडली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधाराच्या या मागणीने बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे सांगितले जात असून या प्रश्नावर येत्या ५ एप्रिलला बैठक होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून खेळाडूंना आयपीएलचे पर्व संपेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा खेळाडू जो रुट यांनाही त्यांच्या संबंधित क्रिकेट बोर्डाकडून आपल्या तुलनेत जास्त मानधन दिले जात असल्याचाही मुद्दा बीसीसीआयसमोर उपस्थित केला. अनिल कुंबळे यांनीही कोहलीच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, कोहलीने केलेली मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीतून मान्य करण्यात आली तर खेळाडू मालामाल होणार आहेत. चेतेश्वर पुजारा भारताकडून केवळ कसोटी सामने खेळतो आणि त्याचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. तर धोनीने कसोटीतून निवृत्ती स्विकारली आहे. त्यामुळे धोनी फक्त वनडे आणि ट्वेन्टी-२० सामने खेळतो. विराटची मागणी मान्य झाल्यास या दोघांनाही वार्षिक पाच कोटींचा लाभ होऊ शकतो. तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया अजिंक्य रहाणे, अश्विन यांसारख्या खेळाडूंचे वार्षिक मानधन १० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.