कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा-लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजवर ४ गडी राखून मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केलं. विराट कोहलीने या सामन्यात निर्णायक अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

विराट कोहलीने ८१ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने ८५ धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिजला मागे टाकलं.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज –

१) सचिन तेंडुलकर – १८ हजार ४२६ धावा

२) कुमार संगकारा – १४ हजार २३४ धावा

३) रिकी पाँटींग – १३ हजार ७०४ धावा

४) सनथ जयसूर्या – १३ हजार ४३० धावा

५) महेला जयवर्धने – १२ हजार ६५० धावा

६) इंझमाम उल-हक – ११ हजार ७३९ धावा

७) विराट कोहली – ११ हजार ६०९ धावा

८) जॅक कॅलिज – ११ हजार ५७९ धावा

९) सौरव गांगुली – ११ हजार ३६३ धावा

१०) राहुल द्रविड – १० हजार ८८९ धावा

नवीन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. २०२० वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. २०१९ वर्षाची अखेर भारतीय संघाने मालिका विजयाने केली आहे, त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.