यजमान न्यूझीलंडने भारतीय संघावर दुसऱ्या कसोटीत ७ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले १३२ धावांचे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोनही क्षेत्रात भारताने खराब कामगिरी केली. आम्ही आमच्या योजनांची नीट अंमलबजावणी करू शकलो नाही. याउलट न्यूझीलंडने नीट ‘प्लॅनिंग’ करून सामना खेळला. या दोन्ही गोष्टींमुळे भारताचा पराभव झाला, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने सामना संपल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करता आले नाही. त्यांनी न्यूझीलंडवर दडपण आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण आमचे गोलंदाज दीर्घकाळ भेदक मारा करण्यात अपयशी ठरले. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीतदेखील गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करूनही त्याचा उपयोग होत नाही, तेव्हा तुम्ही निराश होता. तसेच काहीसे झाले आहे. त्यामुळे आता ड्रेसिंग रूममध गेल्यावर ज्या चुका झाल्या आहेत, त्या शोधून दुरूस्त करणे हेच आमचे काम असणार आहे”, असे विराटने स्पष्ट केले.

टॉस जिंकणे किंवा पराभूत होणं यावर काही गोष्टी अवलंबून असतात. पण त्याबद्दल आपण तक्रार करू शकत नाही. नाणेफेक जिंकणं आपल्या गोलंदाजांना फायद्याचे ठरते, पण जेव्हा तुम्ही परदेशात खेळता आहात, त्यावेळी मात्र तुम्हाला या साऱ्या गोष्टी गृहित धरायला हव्यात. हा पराभव स्वीकारायलाच हवा. आणि भविष्यात जर आम्हाला परदेशात जाऊन सामने जिंकायचे असतील तर सुधारणा करायला हवी. काहीही कारणं न देता चुका सुधारून पुढे जाणं हेच सध्या आमच्या हातात आहे.