भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भारतीय संघाची कमान सांभाळल्यापासून विराट मैदानात धावांचे इमले रचतो आहे. प्रत्येक मालिकेत एक नवीन विक्रम आपल्या नावावर करतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत विराटने सचिनचा सर्वात जलद 10 हजार धावांचा विक्रम मागे टाकला. 5 नोव्हेंबरला विराटने वयाच्या तिशीत पदार्पण केलं, यावेळीही संपूर्ण देशभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्याची ही लोकप्रियता पाहून All India Gaming Federation ने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून विराटला देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली आहे.

“क्रिकेट हा भारतातला सर्वाधीक प्रेक्षक पसंती मिळालेला खेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराटने आपल्या खेळीने सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. जागतिक पातळीवर विराटने भारताचं नाव नेहमी उंच केलं आहे, त्याच्या या कामगिरीसाठी ‘भारतरत्न’ पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात यावा”, अशी मागणी All India Gaming Federation ने आपल्या पत्रात केली आहे. विराटला भारतरत्न पुरस्कार दिल्यास हे त्याच्या मेहनतीला मिळालेलं फळ असेल असंही संघटनेने म्हटलं आहे. याआधी क्रिकेटमध्ये फक्त सचिन तेंडुलकरचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

कोहलीने आतापर्यंत 73 कसोटी आणि 216 वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 38 तर कसोटीत 24 शतकांची नोंद आहे. सध्या विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आली आहे. आगमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट पुन्हा पुनरागमन करेल. हा दौरा भारतीय संघासाठी खडतर मानला जात आहे, त्यामुळे या मालिकेत विराट व भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.