भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत मोठ्या फरकाने पराभव केला. इंग्लंडला पहिल्या डावात १३४ तर दुसऱ्या डावात १६४ धावात करता आल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय खेळपट्टीवर टीका केली. इंग्लंडच्या फलंदाजीला घाबरून चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक बनवण्यात आली. तसंच भारताने नाणेफेक जिंकली म्हणूनच त्यांना सामना जिंकण्याची संधी मिळाली, असा दावा मायकल वॉन याने केला होता. त्यावर विराटने सामन्यानंतरच्या मुलाखतीत उत्तर दिलं.

“दोन्ही संघांसाठी खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक होती. पण सुदैवाने आमच्या फलंदाजांनी अधिक चांगला खेळ करून दाखवला. अशा खेळपट्ट्यांवर नाणेफेक फारशी निर्णायक ठरत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आपण धावा करू शकतो असा आमच्या संघाला विश्वास होता. त्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या डावात आम्ही चांगली मजल मारली. दोन्ही डावात मिळून आम्ही ६०० धावा केल्या ही फार मोठी गोष्ट आहे”, अशा शब्दात त्याने इंग्लंडच्या कर्णधाराच्या दाव्याला सडेतोड उत्तर दिलं.

“वर्षभराने घरच्या मैदानावर खेळताना स्टेडियममध्ये कोणीच नसणं ही भावना खूपच विचित्र होती. सामना पाहायला स्टेडियममध्ये कोणीच नसल्याने आमच्या संघाला लय सापडायला वेळ गेला. या सामन्यात प्रेक्षक स्टेडियममध्ये परतले आणि आमच्या संघानेही झोकात पुनरागमन केले. कारण सामन्या जिंकण्यात प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. प्रेक्षकांमुळे खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार होतो. आजचा विजय हा सांघिक कामगिरीचा विजय आहे”, असं विराट म्हणाला.

“चेन्नईचे प्रेक्षक खूप हुशार आहेत. त्यांना क्रिकेट नीट कळतं. जी १५-२० मिनिटं माझ्या गोलंदाजांना पाठिंब्याची आणि ऊर्जेची गरज होती, तेव्हा मी कर्णधार म्हणून ती जबाबदारी स्वीकारली. जेव्हा उन्हात माझे गोलंदाज गोलंदाजी करत असतात तेव्हा त्यांचे मनोधैर्य वाढवणं माझं कर्तव्य असतं. मी तेच केलं आणि प्रेक्षकांनी मला चांगला प्रतिसाद दिला” , अशा शब्दात विराटने प्रेक्षकांचे आभार मानले.