अनेक विक्रमांना लीलया गवसणी घालणाऱ्या व भारताचं रन मशिन अशी ओळख मिरवणाऱ्या विराट कोहलीला डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडायची संधी सध्याच्या द. अफ्रिकेच्या दौऱ्यात आहे. क्रिकेट जगतातला सर्वात थोर फलंदाज असा फलंदाज असलेल्या दी ग्रेट ब्रॅडमनचा रेकॉर्ड विराट मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

या दौऱ्यामध्ये आत्तापर्यंत 29 वर्षीय विराटनं 13 खेळींमध्ये 870 धावा कुटल्या आहेत. आता दोन टी-20 सामने शिल्लक असून विराटनं 104 धावा केल्या तर विराट ब्रॅडमनचा एक रेकॉर्ड मागे टाकेल. ज्याला अविश्वसनीय म्हणता येईल अशी कामगिरी डॉन ब्रॅडमन यांनी केली होती. 1930 मध्ये इंग्लंड विरोधात खेळताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ब्रॅडमननी 974 धावा काढल्या होत्या. दौऱ्यावर सर्वाधिक धावांच्या बाबतीत 974 धावांसह ब्रॅडमन दुसऱ्या स्थानावर आहेत.

दौऱ्यामध्ये सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या विव्हियन रिचर्ड्सच्या नावावर आहे. एका दौऱ्यामध्ये 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केवळ रिटर्ड्सनी केलाय. 1976 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना चार कसोटी (829) व तीन एकदिवसीय सामने (216) यामध्ये रिचर्ड्सनं 1045 धावा केल्या होत्या आणि याबाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यामुळे विराटनं दोन टी-20 मध्ये जर काही 130 धावा काढल्या तर तो रिचर्ड्सलाही मागे टाकेल आणि एका दौऱ्यामध्ये सगळ्यात जास्त धावा फटकावणारा फलंदाज असा विक्रम विराटच्या नावावर लागेल.

गेल्या दोन महिन्यांमध्ये कोहली कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यानं 47.66 च्या सरासरीनं 286 धावा काढल्या, तर सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटनं 558 धावा काढल्या. यामध्ये तीन शतकं व एका अर्धशतकाचा समावेश आहे. या दौऱ्यामध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे विराटने आयसीसी रँकिंगमध्ये 900 रेटिंग पॉइंटसचा टप्पा ओलांडला आहे. हा स्वत:तच एक विक्रम आहे कारण हा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याचे सध्या 909 रेटिंग पॉइंट असून गेल्या 27 वर्षांमध्ये कुणालाही इतकी मजल मारता आली नव्हती.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात विराटनं 20 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या होत्या. आता आणखी दोन खेळी त्याच्यासाठी शिल्लक असून तो ब्रॅडमनचा आणि पुढे जात रिचर्ड्सचा विक्रम मोडतो का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.