भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीमधील दुसरा दिवस गाजवला तो ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने. दोनशेहून अधिक धावांची भागीदारी करत दोघांनीही भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड ६२२ पर्यंत नेला. अखेर जडेजा बाद झाल्याने कोहलीने डाव घोषित केला. पण या दोघांच्याही तुफानी खेळीपुढे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज निष्प्रभ ठरल्याचे दिसले. ऋषभ पंतने दीडशे धावा करत अनेक विक्रम मोडीत काढले. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात शतक करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला. ऋषभच्या या खेळीआधी खुद्द विराटने नेट्समध्ये त्याचा सराव घेतला होता. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून या सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी भारताने ३०३ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताने त्यामध्ये ३१९ धावांची भर घातली. यामध्ये सर्वाधिक धावा ऋषभ पंतने केल्या. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी विराटनेच ऋषभच्या फलंदाजीचा सराव स्वत: करुन घेतला. पंत फलंदाजीचा सराव करत असताना विराटने स्वत: त्याला चेंडू टाकले. बीसीसीआयने ‘विराट टू पंत – आपल्या सहकाऱ्याला सरावात मदत करताना’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर हुनमा विहारीचे अर्धशतक अगदी थोडक्यात हुकले तर पुजारेचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. मात्र त्याची कसर जडेजा आणि पंतने भरुन काढत चांगली फटकेबाजी करत २०० हून अधिक धावांची भागीदारी केली.