भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नेटमध्ये कसून सराव केला. सराव करताना विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलीस याची नक्कल केली. विराट कोहलीनं केलेली ही नक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अहमदाबादमधील नूतनीकरण केलेले नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममधील कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीनं नेटमध्ये स्टिव्ह स्मिथच्या फलंदाजीचा आणि जॅक कॅलीसच्या गोलंदाजीची नक्कल केली आहे. नेट्समध्ये सराव करताना विराट स्मिथच्या फलंदाजीच्या शैलीची नक्कल केली तर कॅलिसच्या गोलंदाजीची हुबेहूब नक्कल केली. स्मिथच्या फलंदाजीचे विराटनं केलेलं अनुकरण पाहणे खरंच मजेदार आहे.

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ कसोटी गोलंदाजांना डिचवण्यासाठी फलंदाजी करताना खेळपट्टीवर हवभाव करत असतो. तीच नक्कल सरावदरम्यान विराटनं केली आहे. दरम्यान सामन्यापूर्वी आरसीआयनं आर अश्विन आणि उमेश यादवसह प्रशिक्षण सत्रात कोहलीच्या गोलंदाजीची क्लिपही शेअर केली होती.

दरम्यान, अहमदाबाद येथील तिसऱ्या सामन्यात विराटचे संपूर्ण लक्ष शतकाचा दुष्काळ संपवण्यावर असेल. चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी आहे. अक्षर पटेल आणि अश्विन याच्या फिरकीपुढे तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावांत इंग्लंडचा संघ ११२ धावांत आटोपला.