भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये विराटने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद या मुद्द्यावरुन अनेक चर्चा होताना दिसतं आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याच्या मते, विराट कोहली कसोटी क्रिकेट जिवंत ठेऊ शकतो. विराट कोहली हा सुपरस्टार खेळाडू असल्याचं स्मिथने म्हटलं आहे.

“सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सुपस्टार’ची कमतरता आहे. इंग्लंड किंवा इतर संघांमध्ये तुम्हाला एखाद-दुसरे खेळाडू दिसतील. विराट कोहली हा सुपरस्टार दर्जाचा खेळाडू आहे. विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये खेळायला आवडतं. विराटमुळेच आयपीएल आणि वन-डे क्रिकेटचा जोर असलेल्या देशात कसोटी क्रिकेटलाही चाहते आहेत. खेळासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे जोपर्यंत विराट कसोटी क्रिकेट खेळत राहिल तोपर्यंत कसोटी क्रिकेट जिवंत राहिलं.” कोलकात्यात आयोजित जगमोहन दालमिया परिषदेत स्मिथ बोलत होता.

ग्रॅम स्मिथने आपल्या कारकिर्दीत ११७ कसोटी सामन्यांमध्ये आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यातील १०९ कसोटी सामन्यांमध्ये स्मिथ आफ्रिकेचा कर्णधार होता. सध्या भारत आणि विंडीज यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळेल. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहली कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.