भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून चांगल्याच फॉर्मात आहे. धोनीनंतर भारतीय संघाची कमान विराटच्या हाती आलेली आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा वन-डे, टी-२० प्रत्येक सामन्यात विराट धडाकेबाज खेळी करत नवे विक्रम रचतच असतो. सोशल मीडियावरही विराटची नेहमी सचिनशी तुलना सुरु असते. अनेकदा विराट आणि पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझम यांच्यातली तुलना होताना दिसते. परंतू पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफानच्या मते सध्याच्या घडीला विराट कोहली हाच जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.

अवश्य वाचा – आम्हाला आऊट कर पण मारु नकोस, भारताचे फलंदाज माझ्याकडे विनंती करायचे – शोएब अख्तर

“विराट मैदानात अतिशय समजुन उमजून फलंदाजी करतो. समोरचा गोलंदाज त्याच्या तोडीचा असेल तर तो त्या षटकात फार फटके न खेळता पाच-सहा धावा काढतो. पण त्यानंतर एखादा नवीन गोलंदाज आल्यानंतर त्याच्या षटकात फटकेबाजी करुन तो सर्व धावा वसूल करतो”, एका यू-ट्युब चॅनलवर बोलत असताना मोहम्मद इरफानने विराट कोहलीचं कौतुक केलं. आपल्या उंचीमुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचाही सामना केला आहे.

पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आलेला असताना मोहम्मद इरफानने एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली होती. या मालिकेत पाकिस्तानी संघाने भारतावर २-१ अशी मात केली होती. भारत दौऱ्यावर असताना मोहम्मद इरफानची गती पाहून अनेक भारतीय फलंदाज आश्चर्यचकीत झाल्याचं खुद्द विराटने इरफानला सांगितलं होतं. मात्र यानंतर कामगिरी घसरत गेल्यामुळे मोहम्मद इरफानला पाकिस्तानी संघात जागा मिळाली नाही.

अवश्य वाचा – बाबर आझमला आयपीएलमध्ये खेळण्याची गरज – नासिर हुसैन