विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ हे आपल्या संघांचे चांगले नेतृत्व करत आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला तर कोहली हा स्मिथपेक्षा सरस आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले आहे.

‘‘एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला तर स्मिथपेक्षा कोहली हा नक्कीच उजवा फलंदाज आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथ हा चांगला फलंदाज आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.

या दोघांच्या नेतृत्वाबद्दल क्लार्क म्हणाला की, ‘‘नेतृत्वाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही समान आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघ सातत्याने विजय मिळवत आहे, त्यामुळे एक कर्णधार म्हणून कोहली सर्वोच्च स्थानी आहे.’’

ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर जेव्हा कसोटी मालिका खेळायला आला होता, तेव्हा फिरकीपटू हरभजन सिंगने भारत ही मालिका ४-० अशा फरकाने सहज जिंकेल, असे म्हटले होते. पण ऑस्ट्रेलियाने ही मालिका १-२ अशी गमावली होती. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाबद्दल क्लार्कला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘मला कोणतेही खळबळजनक विधान करून तुम्हाला मोठी बातमी द्यायची नाही. पण माझ्या मते आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करत कामगिरीत सातत्य राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ही एक संधी असेल. ऑस्ट्रेलियाच्या संघात पुरेशी गुणवत्ता आहे. या खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे.’’

भारतीय संघ सध्या आक्रमक क्रिकेट खेळत आहे. याबद्दल क्लार्क म्हणाला की, ‘‘भारतीय संघ जो आता आक्रमकपणे खेळताना दिसतो, त्याचे श्रेय सौरव गांगुलीला द्यायला हवे. कारण त्यानेच या गोष्टीची सुरुवात केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे आणि कोहली यांनी आपल्या पद्धतीने संघाचे चांगले नेतृत्व केले. कोहली हा एक आक्रमक कर्णधार आहे, त्याला एकही सामना गमावलेला चालत नाही.’’

‘‘आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भारताच्या वातावरणाशी जुळवून घेता आले आहे. त्यांच्यासाठी भारत हे दुसरे घरच आहे. त्यामुळे त्यांना येथील वातावणाशी जुळवून घेताना जास्त समस्या येणार नाही,’’ असेही क्लार्कने यावेळी सांगितले.