भारतीय कर्णधार विराट कोहली हा कायम चर्चेत असतो. त्याच्या खेळामुळे तो सतत नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतो. नुकताच त्याला ICC चे तीन सर्वात मोठे पुरस्कार एकत्र मिळाले. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. याच विराट कोहलीशी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याची सातत्याने तुलना केली जात आहे. पाकिस्तानच्या अनेक दिग्गज आणि जाणकार लोकांनी त्याची तुलना विराट कोहलीशी केली आहे. मात्र बाबर आझमने ही तुलना चुकीची असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेआधी तो एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधत होता. त्यावेळी त्याला विराट सोबत होणाऱ्या तुलनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की विराट हा खूपच महान आणि दिग्गज फलंदाज आहे. माझी त्याच्याशी तुलना करणे हे मला पटत नाही. कारण मी त्याच्या विक्रमांच्या किंवा त्याच्या आसपासदेखील नाही.

‘ज्यावेळी मी माझी तुलना विराटशी होत असल्याचे ऐकतो, तेव्हा मला तो फारसे रुचत नाही. माझ्या कारकिर्दीला मी नुकतीच सुरुवात केली आहे. मला माझ्या आयुष्यात आणि क्रिकेट कारकिर्दीत अजूनही खूप काही कमवायचे आहे. पण विराटने आपल्या कारकिर्दीत भरपूर काही मिळवले आहे. मला अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. मी जर उत्तम क्रिकेट खेळून त्याच्या इतका चांगला खेळाडू झालो तर त्यावेळी तुम्ही माझी त्याच्याशी खुशाल तुलना करा. पण तोवर जरा धीर धरा, असेही बाबरने सांगितले.