मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. आता विराटदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवनवे विक्रम करत आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यात सरस आहे, असे मत काही दिवसांपूर्वी एबी डीव्हिलियर्स याने व्यक्त केले होते. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने सचिन आणि विराट यांच्या देहबोलीतील फरक सांगितला होता. तसेच, नव्या नियमांचे कारण देत विराटपेक्षा सचिन अधिक आवडता फलंदाज आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सांगितले होते. त्यानंतर आता एका माजी पंचांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे.

७४ कसोटी, १४० वन डे आणि ३७ टी २० सामन्यांत पंच म्हणून काम पाहिलेले ICC चे निवृत्त पंच इयन गुल्ड यांनी विराटमध्ये सचिनच्या खेळीची झलक दिसते असं मत व्यक्त केलं आहे. “विराटचा एकंदर वावर खूपच हसतखेळत असतो. तो एक-दोन वेळा माझ्यासारखी फलंदाजी करताना मला दिसला. पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात सचिनच्या खेळीची झलक दिसते. सचिनसारखाच तो जेव्हा फलंदाजीला उतरतो, तेव्हा संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं, पण तो ते ओझं अगदी सहज पेलतो”, असे गुल्ड म्हणाले.

“विराट म्हणजे कायम टाय, सूट-बूट परिधान केलेली अशी व्यक्ती असेल असं अनेकांना वाटतं, पण तो मात्र एकदम मस्त मुलगा आहे. तुम्ही कधीही त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाऊन तासन् तास गप्पा मारू शकता. तो खूप बोलका आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला क्रिकेटचा खेळ नीट समजला आहे. क्रिकेटचा इतिहास त्याने नीट जाणून घेतला आहे. तो खरंच खूप छान माणूस आहे”, असेही गुल्ड यांनी सांगितले.