X
X

विराट कोहली कर्णधार म्हणून धोनीवर अवलंबून – अनिल कुंबळे

READ IN APP

धोनीचा अनुभव विराटसाठी फायदेशीर !

भारतीय संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या संघाची कमान यशस्वीपणे सांभाळली आहे. मात्र भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मते महेंद्रसिंह धोनी मैदानात असतानाच, विराट कोहली उत्तम कर्णधार म्हणून काम करतो. CricketNext या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कुंबळे यांनी आपलं मत मांडलं आहे.

“माझ्या दृष्टीकोनातून कोहली हा उत्तम कर्णधार नाहीये, पण सध्याच्या घडीला त्याला पर्यायही नाहीये. मात्र महेंद्रसिंह धोनी मैदानात असताना विराट कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करतो. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये जो संवाद होतो, त्यातून विराट मैदानावर चांगले निर्णय घेतो. धोनीने एका प्रदीर्घ कालावधीपर्यंत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्याच्या गाठीशी असणारा अनुभव हा इतर खेळाडूंपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. तो इतरांपेक्षा सामन्याचा अंदाज अधिक योग्यपणे लावू शकतो. गोलंदाजाने कोणती दिशा पकडावी, टप्पा कुठे असावा, क्षेत्ररक्षण कसं लावावं याचा अंदाज धोनी बरोबर लावतो. त्यामुळे वन-डे क्रिकेटमध्ये विराट हा धोनीवर अवलंबून आहे.” कुंबळेनी विराटच्या कामगिरीचं विश्लेषण केलं.

नुकत्याच घरच्या मैदानावर पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताला २-० या आघाडीवर ३-२ अशा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अखेरच्या दोन वन-डे सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीला विश्रांती दिली होती. मात्र त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने अतिशय ढिसाळ यष्टीरक्षण केलं. यावेळी चाहत्यांनी धोनीला संघात परत बोलवा अशी मागणी केली होती. विराटला अखेरच्या दोन वन-डे सामन्यात धोनीली उणीव भासली असणार असंही कुंबळे म्हणाले.

२३ मार्चपासून भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. ३० मे पासून इंग्लंडमध्ये वन-डे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आयपीएलदरम्यान आपल्यावरील ताण कसा सांभाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

20
X