पाकिस्तानच्या बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावे असलेला विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून बाबर आझम आता ओळखला जाईल. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात बाबरने या विक्रमाची नोंद केली. बाबरने २६ डावांमध्ये ही कामगिरी केली, याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे हा विक्रम जमा होता. विराटने २७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचं द्वंद्व आपल्याला परिचीत आहे. मात्र विराटचा विक्रम मोडल्यानंतरही बाबर आझमने, विराट हाच माझा आदर्श असल्याचं मान्य केलं आहे. “विराट कोहली हा माझा आदर्श आहे. जेव्हा तो खेळपट्टीवर येतो त्याच्यातला आत्मविश्वास हा दाद देण्यासारखा आहे. त्याच्या प्रत्येक खेळीमध्ये धावांची भूक असते.” क्रिकेट स्टॅटिस्टीशियन मझर अर्शद यांनी बाबरचं हे वक्तव्य आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलं आहे.

दुबईत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या टी२० सामन्यात हा पराक्रम केला. त्याने या सामन्यात ५८ चेंडूत ७९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. आपल्या खेळीत ४८वी धाव घेत त्याने कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.