विराट कोहलीचा आक्रमकपणा भारतीय संघातील इतर खेळाडूंसोबत मेळ खात नाही, त्याची शैली ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांनी दिली आहे. चॅपल यांचा सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये विराट कोहली आणि भारतीय क्रिकेटबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी भारताच्या माजी क्रिकेटपटूंची तुलना महात्मा गांधी यांच्या विचारांशी केली. भारताचे माजी क्रिकेटपटू गांधीवादी विचाराचे असल्याचं चॅपल यांनी सांगितलं. विराट कोहलीच्या आक्रमकपणामुळे भारतीय क्रिकेटमध्ये बदल झाल्याचेही चॅपल म्हणाले.

पूर्व भारतीय क्रिकेटपटू प्रतिस्पर्धी संघाविरोधात आक्रमक भूमिका घेत नव्हते, कदाचीत ते गांधीवादी विचाराचे होते. पण सौरव गांगुलीनं हा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न केला. गांगुलीच्या आक्रमकपणामुळे भारतीय संघाला विदेशातही यश मिळण्यास सुरुवात झाली. नेतृत्वामध्ये आक्रमकपणा दाखवणारा सौरव पहिला भारतीय कर्णधार होता, असे चॅपल म्हणाले आहेत.

विराट कोहली शांततेनं उत्तर देणाऱ्या खेळाडूंपैकी नाही, आक्रमक शैली हिच त्याची ताकद आहे. प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची विराटची शैली आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियन खेळाडूसारखा आक्रमक आहे. तो नव्या भारताचा प्रतिक आहे. विराट कोहली आपल्या संघाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं ओळखतोय, असेही चॅपल यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.