विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ लॉसन यांनी व्यक्त केले.
‘हा कोहलीच्या कारकीर्दीतील स्वप्नवत कालखंड आहे. २०११ मध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळीच त्याच्या प्रतिभेने मी प्रभावित झालो होते. ऑस्ट्रेलियातल्या चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपटय़ांवर खेळण्याचे आव्हान स्वीकारणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंत त्याचा समावेश होतो,’ असे लॉसन यांनी सांगितले. कांदिवली येथील पय्याडे स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित प्रशिक्षण उपक्रमावेळी लॉसन बोलत होते.
‘ऑस्ट्रेलियात खेळताना त्याचा चेहरा पुरेसा बोलका होता. तंत्रकौशल्याची कसोटी पाहणाऱ्या खेळपटय़ांवर यशस्वी होऊन दाखवायचे असा चंग बांधल्याचे त्याच्या देहबोलीतून स्पष्ट झाले होते. सचिन तेंडुलकरसह अन्य खेळाडू अपयशी ठरत असताना कोहलीने अफलातून खेळी करत स्वत:ची छाप उमटवली. केवळ भारतात नाही तर जगभर धावा केल्या तरच कौशल्य सिद्ध होईल ही भावना त्याच्या खेळातून जाणवली’, असे लॉसन यांनी सांगितले.
भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या मुंबईकर शार्दूल ठाकूरचा लॉसन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.