ऑस्ट्रेलियाविरूद्ध इंग्लंडने दुसरा टी२० सामना जिंकत मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद १५७ धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने सलामीला येत नाबाद ७७ धावा ठोकल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरला सामनावीर घोषित करण्यात आले. बटलर च्या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने बटलर हा मर्यादित षटकांच्या सामन्यातील इंग्लंडचा सर्वोत्तम क्रिकेटर असल्याचे म्हटले.

त्यावर एका भारतीय चाहत्याने, ” विराट कोहली हाच सर्वोत्तम क्रिकेटर आहे”, असा रिप्लाय दिला. या मेसेजवर उत्तर देताना स्टुअर्ट ब्रॉडने शांतपणे रिप्लाय केला की मला तुझं म्हणणं मान्य आहे. विराट हा भारताचा सर्वोत्तम क्रिकेटर आहेच. पण मी बटलरला इंग्लंडचा सर्वोत्तम क्रिकेटर म्हटलं आहे.

असा रंगला सामना-

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना वाईट सुरूवात केली. पण मार्कस स्टॉयनीस आणि फिंचने डाव सांभाळला. फिंचने सर्वाधिक ४० धावा केल्या तर स्टॉयनीस ३५ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ बाद ८९ होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि अश्टन अगार या दोघांनी ऑस्ट्रेलियाला ७ बाद १५७ ही धावसंख्या गाठून देण्यास मदत केली.

इंग्लंडला दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो ९ धावांवर हिट विकेट झाला. त्यानंतर डेव्हिड मलानने बटलरला साथ दिली. या दोघांनी १३व्या षटकात इंग्लंडला शंभरी पार करून दिली, पण ४२ धावांवर मलान बाद झाला. पण बटलरने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि दमदार खेळ केला. ५४ चेंडूत त्याने नाबाद ७७ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.