श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांच्या कालखंडात भारतीय कर्णधार विराट कोहलीला अत्यावश्यक विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय निवड समिती सोमवारी श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी, त्यानंतर होणारी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका याकरिता भारतीय संघांची निवड जाहीर करणार आहे.

आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट सामने खेळणाऱ्या कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी एक महिन्याची विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या मालिकेत रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात येईल. नवी दिल्ली येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी कोहलीला विश्रांती दिल्यास अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद दिले जाईल.

दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी बुमराह, कुलदीप शर्यतीत

  • राष्ट्रीय निवड समिती सोमवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर करणार असून, अतिरिक्त गोलंदाजाच्या स्थानासाठी ‘यॉर्कर विशेषज्ञ’ जसप्रित बुमराह आणि ‘चायनामन’ कुलदीप यादव यांच्यात कडवी स्पर्धा असेल.
  • कोहलीच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या महत्त्वाच्या मालिकेसाठी निवडण्यात येणाऱ्या संघाविषयी क्रिकेटवर्तुळात विशेष उत्सुकता आहे.या दौऱ्यासाठी १७ सदस्यीय भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाज किंवा पाच वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज असे दोन पर्याय निवड समितीपुढे असतील. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव या चार गोलंदाजांची निवड होऊ शकेल, तर अतिरिक्त गोलंदाज म्हणून बुमराहला संधी मिळू शकते.
  • एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय निवड समिती दिल्लीच्या नवदीप सैनीची आश्चर्यकारक निवड करू शकते. मात्र अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात स्थान दिल्यास पाचव्या गोलंदाजाचा प्रश्न आपोआप सुटू शकतो. फिरकी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे स्थान निश्चित असले तरी कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल या मनगटी गोलंदाजांचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो.