News Flash

कर्णधारपद सोडूनही धोनीने केले ‘नेतृत्व’, विराटच्या मदतीला धावला अनेकदा

त्याच्या या निर्णयांचा फायदा झाल्याचे विराट कोहलीनेच सांगितले.

टीम इंडियातला हलकाफुलका क्षण!

महेंद्र सिंह धोनीने सलग १० वर्षे कर्णधारपद भूषवल्यानंतर आता तो पहिल्यांदाच इतक्या काळानंतर केवळ एक यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या रुपात दिसला. असे असली तरी  त्याचा मैदानावरचा वावर इतका सहज होता की त्याने कर्णधारपद सोडले किंवा नाही याची जणू त्याला पर्वाच नव्हती. इतके वर्षे कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर साहजिकच त्याच्याजवळ अनुभवाचा खजिना इतरांपेक्षा जास्त राहणारच. तेव्हा त्याने अनेक वेळा या गोष्टीची झलक दाखवून दिली. धोनीच्या या अनुभवाचा सर्वाधिक फायदा झाला तो पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचा कर्णधार झालेल्या विराट कोहलीला.

२००७ नंतर पहिल्यांदाच धोनी हा यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या रुपात खेळताना दिसला. कर्णधारपद असो वा नसो धोनीकडे नेतृत्वगुण हे नैसर्गिकरित्याच आहेत हे त्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे. कॅप्टन कूल म्हणून नावारुपाला आलेल्या धोनीने आपल्या निर्णयामुळे सामन्यामध्ये रंग भरले. त्याच्या या निर्णयांचा फायदा झाल्याचे विराट कोहलीनेच सांगितले. तीन दिवसाच्या या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली आहे. कोहलीने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळत शतकही ठोकले.

जेव्हा खेळाला सुरुवात झाली तेव्हा सातव्याच षटकात धोनीच्या चाणाक्षतेची झलक पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराहने डीप फाइन लेगवरुन बॉल फेकला आणि तो थेट यष्टीवरच येऊन आदळला. तो बॉल तेव्हा डेड झाला नव्हता. अशा वेळी फलंदाज हे एक चोरटी धाव काढतात. परंतु धोनीने ही शक्यता आधीच ओळखली आणि त्या बॉलला थांबवण्याची सूचना त्या ठिकाणी असलेल्या फील्डरला दिली.

मैदानावर असलेल्या प्रेक्षकांच्या चीअरिंग आणि गोंगाटामुळे बऱ्याचदा असे होत होते की कोहलीचा आवाज क्षेत्ररक्षकापर्यंत पोहचत नव्हता. त्यामुळे कोहलीच्या सूचना खेळाडूंपर्यंत पोहचत नव्हत्या. नवव्या षटकावेळी जेव्हा शिखर धवनला स्लीपवरुन हटवून मिडविकेटवर ठेवायची कर्णधार विराटची इच्छा होती. परंतु गोंगाटामुळे त्याला हा संदेश पोहचलाच नाही.

धोनीचे मात्र या गोष्टीकडे बारकाईने लक्ष होते. त्याने ती सूचना शिखर धवनला दिली. याबरोबरच मैदानात फिल्डिंग कशी लावण्यात आलेली आहे याकडे देखील त्याने लक्ष ठेवले. इतकेच नव्हे तर त्याला काही बदल हवे असतील ते त्याने सूचवले आणि विराट कोहलीने ते मान्य देखील केले. २९ व्या षटकांमध्ये पॉइंटवर असलेल्या फील्डरला धोनीने सर्कलच्या आत फिल्डिंगला लावले. त्यामुळे त्या ठिकाणी जो रुट चोरट्या धावा काढू शकला नाही. अशा अनेक ठिकाणी निर्णय घेऊन सामना जिंकण्यास धोनीने हातभार लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:59 pm

Web Title: virat kohli mahendra singh dhoni pune india vs england one day match captain
Next Stories
1 VIDEO: विराट कोहलीच्या आधी घेतला धोनीनेच रिव्ह्यूचा निर्णय
2 विराटसेनेचा धमाकेदार विजय
3 अल्फोन्सेचा अनपेक्षित विजय
Just Now!
X