भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी १९९७ साली सचिन तेंडुलकर आणि २००७ साली महेंद्रसिंह धोनीला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. दरवर्षी हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टरोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. मात्र यंदा आशियाई खेळांमुळे या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

पुरस्कारसोहळ्याआधी आज सकाळी मीराबाई चानूने ट्विटरवरुन खेलरत्न पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे. याव्यतिरीक्त विविध क्रीडा प्रकारातील २० खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.