नागपूरमधील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे विराट कोहली या वर्षातील ४५ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून त्याचा सातत्यपूर्ण प्रवास सुरु आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. मात्र, दुखापतीतून सावरताच तो पुन्हा संघामध्ये सहभागी झाला. याशिवाय आयपीएलमध्ये तो १० सामने खेळला आहे.

भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या विराटने या वर्षात तब्बल ४५ सामने खेळले आहेत. यात ९ कसोटी सामने, २६ वनडे आणि १० टी-२० सामन्यांचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उर्वरित तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिकेतील सर्व सामन्यात तो मैदानात उतरला तर वर्षभरात सातत्यपूर्ण ५० हून अधिक सामने खेळण्याचा एक विक्रमच त्याच्या नावावर होईल.

भारतीय संघातील इतर खेळाडूंच्या वर्षभरातील कामगिरीकडे पाहिले तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी ३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. तर पांड्याला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. इतर खेळाडूंच्या तुलनेत विराटला नेतृत्वाशिवाय अपेक्षांचे ओझे घेऊन मैदानात उतरावे लागते. त्याने ही जबाबदारी उत्तमपणे पार देखील पाडली. विराट हा भारतीय संघाची एक संपत्ती आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्या विश्रांतीबाबत भान बाळगणे गरजेचे आहे. विराटच्या नाराजीचा सूर योग्य होता यात वाद नाही. विश्रांतीशिवाय आणि सरावाअभावी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा कस लागणार असल्याचे संकेतच विराटने दिले आहेत. यशाच्या शिखरावर असणाऱ्या भारतीय संघाची खरी ताकद समजेल. त्यामुळे हा दौरा भारतासाठी कसोटीच असेल.

बीसीसीआय निवड समिती २०१९ च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रयोग करत आहे. यात नव्या खेळाडूंना संधी देण्यावर भर दिला जातोय. बीसीसीआयचा हा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती कशापद्धतीने देता येईल, यावर काम करावेच लागेल. पण बीसीसीआयला शहाणपण कधी येणार? याचा अंदाज बांधणे खरंच कठीण आहे. पण विराटला विश्रांतीची नक्कीच गरज आहे.