भारताचा कर्णधार विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर हा त्याचा आदर्श आहे. सचिन एक सर्वोत्तम खेळाडू होता. पण आव्हानांचा पाठलाग करण्याची वेळ येते, तेव्हा विराट हा सचिनपेक्षा उत्कृष्ट आहे, असे मत आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने व्यक्ते केले होते. बंगळुरू संघासाठी विराट आणि एबी दोघांनी अनेकदा दमदार खेळी केली आहे. त्यांनी एकत्रितपणे भागीदारी करूनही संघाला चांगली धावसंख्या गाठून दिलेली आहे. याच भागीदारीबद्दल एबी डीव्हिलियर्सने ताज्या मुलाखतीत मत मांडलं.

“गोलंदाजांचा सामना करण्याची आम्हा दोघांची पद्धत वेगवेगळी आहे. मला वैयक्तिकरित्या थोडं लवकर आक्रमण करायला आवडतं. माझ्यातील उणिवा दिसू नयेत यासाठी तो प्लॅन असतो. म्हणूनच मी आल्यापासून फटकेबाजी करत असतो. मला ५ षटकं जरी खेळून दिली, तरी समोरच्या संघापुढे धावांचा डोंगर उभा राहिल अशी भावना गोलंदाजांमध्ये मी खेळताना निर्माण व्हायला हवी असे मला वाटते. पण विराट हा एक विश्वासार्ह फलंदाज आहे. आपण १५ षटके फलंदाजी करावी अशी त्याची नेहमी इच्छा असते. मी खेळ पटकन बदलण्याच्या दृष्टीने खेळत असतो. एखाद्या इंजेक्शनप्रमाणे मला खेळाची दिशा बदलायला आवडते, पण विराट त्याच्या पद्धतीने खेळ करत राहतो. म्हणूनच विराट माझ्यापेक्षाही भरवशाचा फलंदाज आहे, तरीही आम्ही एकत्र खेळताना संघाला खूप फायदा होतो”, असे डिव्हिलियर्सने बुधवारी क्रिकबझवर हर्षा भोगलेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

डीव्हिलियर्सला सुरूवातीला विराटबद्दल काय वाटायचं?

काही दिवसांपूर्वी डीव्हिलियर्सने विराटशी लाइव्ह चॅटद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी तो विराटबद्दल म्हणाला होता, “तुला एक खूप मजेशीर गोष्ट सांगतो. मी तुझ्याबद्दल (आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक) मार्क बाऊचरकडून खूप ऐकलं होतं. मी तुला ओळखत होतो, पण आपली कधी भेट झाली नव्हती. जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो, तेव्हा माझ्या मनात असं सुरू होतं की या माणसावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही… पण मला तुला ओळखायला जास्त वेळ लागला नाही. तू एक चांगला माणूस आहेस, हे मी लगेच ओळखलं होतं.”