सातत्यपूर्ण प्रदर्शनासह विराट कोहली भारतीय संघाचे रनमशीन ठरला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही आघाडय़ांवर विराट कोहलीने भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. मैदानावरच्या या यशाची परिणिती म्हणजे जाहिरात विश्वात विराट कोहली हा सर्वाधिक मागणी असलेला ब्रँण्ड ठरला आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी जाहिरातक्षेत्रावर आपली छाप सोडली होती. पण आता विराट कोहली हा विपणन विश्वासाठी खपाचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्पोर्टप्रो या इंग्लिश नियतकालिकाने तयार केलेल्या जागतिक स्तरावरील मौल्यवान खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश आहे. त्याला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. आगामी तीन वर्षांमध्ये ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून चमक दाखविण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. स्पोर्टप्रो नियतकालिकाच्या जूनच्या अंकात ही यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. कोहलीखेरीज इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन या एकमेव क्रिकेटपटूला या यादीत स्थान देण्यात आले आहे. लेविस हॅमिल्टन हा अग्रस्थानावर असून अव्वल दर्जाचे फुटबॉलपटू नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट, टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच, अँडी मरे, व्हिक्टोरिया अ‍ॅझारेन्का, मोटार शर्यतपटू सेबॅस्टीयन व्हेटेल यांचाही समावेश आहे.