आज होणाऱ्या बीसीसीआयच्या आयपीएल घोषणेकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील संघ आपल्या ताफ्यात कायम ठेवतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) गुरुवारी संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

भारताचा कर्णधार म्हणून कारकीर्द बहरात असणाऱ्या कोहलीला अद्याप आयपीएलमध्ये हे यश मिळालेले नाही. मात्र धोनीने चेन्नईला आयपीएलमध्ये दिमाखदार यश मिळवून दिले आहे. या पाश्र्वभूमीवर २०१८ ते २०२० या पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी बेंगळूरु आणि चेन्नई या संघांमध्ये कोहली आणि धोनी यांना कायम ठेवण्यात येणार आहे.

मागील हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्मालाही संघात कायम ठेवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ालासुद्धा मुंबई इंडियन्सच्या संघात कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे मागील दोन हंगामांमध्ये गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व करणारा रवींद्र जडेजा पुन्हा चेन्नईच्या संघात परतण्याची शक्यता आहे, तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद संघात कायम ठेवू शकेल.

दोन वर्षांच्या बंदिवासानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघात सध्या सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला स्थान मिळू शकेल. खेळाडूंच्या लिलावाआधी खेळाडू कायम ठेवण्याच्या नियमानुसार प्रत्येक संघ पाच खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो, असा निर्णय नवी दिल्ली येथे ६ डिसेंबरला झालेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यात जास्तीत जास्त तीन अनुभवी भारतीय खेळाडू, दोन परदेशी खेळाडू आणि दोन नवख्या भारतीय खेळाडूंचा समावेश करता येऊ शकता. यापैकी चेन्नई आणि राजस्थानला २०१५मधील त्यांच्या संघातील खेळाडूंना कायम ठेवता येऊ शकते. आयपीएल २०१७च्या हंगामात यापैकी बहुतांशी खेळाडू रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स संघाकडून खेळले होते.

आगामी हंगामासाठी प्रत्येक संघाला खेळाडूंकरिता ८० कोटी रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. याचप्रमाणे २०१९ आणि २०२० या वर्षांकरिता हे संघ अनुक्रमे ८२ आणि ८५ कोटी रुपये मानधनासाठी खर्च करू शकतील. प्रत्येक संघात जास्तीत जास्त २५ आणि किमान १८ खेळाडूंना स्थान देता येऊ शकते.