ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्याच सराव सामन्यात भारताने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत सकारात्मक सुरुवात केली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला.ग्लिडरोल स्टेडियमवरील या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २१९ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने ९१ षटकांत ८ बाद ३६३ धावा केल्या. वेगवान गोलंदाज वरुण आरोनने यजमान संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी आपली ताकद दाखवली.
कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ६० धावांची खेळी साकारली. याशिवाय मुरली विजय (५१), चेतेश्वर पुजारा (५५), वृद्धिमान साहा (नाबाद ५६) आणि कर्ण शर्मा (नाबाद ५५) यांनी अर्धशतके झळकावली. तसेच सुरेश रैनाने ४४ व रोहित शर्माने २३ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांपैकी शिखर धवन (१०) आणि अजिंक्य रहाणेने (१) निराशा केली.