फाइव्ह-अ-साइड फुटबॉल (फुटसाल) खेळाच्या प्रीमिअर लीगसाठी भारताचा ख्यातनाम क्रिकेटपटू विराट कोहलीची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत कोहलीने सांगितले की, ‘फुटसाल हा खेळ खरोखरीच प्रेक्षणीय क्रीडा प्रकार आहे. मीदेखील लहानपणापासून हा खेळ खेळलो आहे. या खेळात वेगवान कौशल्यास पुष्कळ संधी असते. त्याचप्रमाणे फुटबॉलमध्ये कारकीर्द करण्यासाठी हा खेळ खूप उपयुक्त ठरतो. चेंडूवरील नियंत्रण, गोल करण्यासाठी आवश्यक असणारे चापल्य व शैली याबाबत हा खेळ अधिक सोपा व आकर्षक मानला जातो.’
प्रीमिअर फुटसाल लीग १५ ते २४ जुलै या कालावधीत होणार आहे. प्रत्येक सामना ४० मिनिटांचा असून वीस मिनिटांचा एक डाव राहील. या लीगमध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये २१ देशांचे खेळाडू भाग घेतील, अशी अपेक्षा आहे.
या लीगचे अध्यक्ष झेवियर ब्रिटो यांनी सांगितले की ‘कोहली याच्यासारख्या महान क्रिकेटपटूने सदिच्छादूताची जबाबदारी स्वीकारत आमच्या खेळाला मोठे केले आहे. त्याच्या नावलौकिकामुळे देशातील युवा खेळाडू या खेळात करिअर करण्याचे धाडस करतील अशी माझी खात्री आहे.’
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशनला पत्र पाठवीत ही लीग अधिकृत नसल्याचे कळविले आहे.