भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशीष नेहरालाही स्थान देण्यात आले आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर माजी क्रिकेटपटू व समालोचक यांचा समावेश असलेल्या निवड समितीने जागतिक ट्वेन्टी-२० पुरुष व महिला या दोन्ही संघांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सरव्यवस्थापक जेफ अ‍ॅलार्दीस यांच्याबरोबरच इयान बिशप, नासिर हुसेन, मेल जोन्स, संजय मांजरेकर, लिसा स्थळेकर यांचा या निवड समितीत समावेश होता.
या स्पर्धेतील पुरुष गटात कोहलीची स्पर्धेचा मानकरी म्हणून निवड करण्यात आली होती. त्याने या स्पर्धेत १३६.५च्या सरासरीने २७३ धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन वेळा अर्धशतके झळकावली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने दुसरे स्थान घेतले. बांगलादेशच्या तमिम इक्बालने २९५ धावा करीत अग्रस्थान मिळविले. नेहराने या स्पर्धेत केवळ पाच बळी मिळवले, मात्र पाचही सामन्यांमध्ये त्याने किफायतशीर गोलंदाजी केली.
पुरुषांच्या जागतिक संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. मात्र महिलांच्या संघात त्यांच्या अनाम अमीनला संधी मिळाली आहे. महिलांच्या जागतिक संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळविता आले नाही. न्यूझीलंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंनी या संघात स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडिजच्या स्टीफनी टेलरची या संघाच्या नेतृत्वपदी निवड करण्यात आली आहे.

जागतिक ट्वेन्टी-२० संघ
पुरुष : जेसन रॉय, डेव्हिड विली, जो रूट, जोस बटलर (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक, दक्षिण आफ्रिका), विराट कोहली (कर्णधार), आशीष नेहरा (भारत), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), आंद्रे रसेल, सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडिज), मिचेल सँटनर (न्यूझीलंड), १२वा खेळाडू : मुस्ताफिझुर रहेमान (बांगलादेश).
महिला : सुझी बेट्स, सोफी डेव्हिन, राचेल प्रिस्ट, लीघ कॅस्पिरेक (न्यूझीलंड), चालरेटी एडवर्ड्स, अ‍ॅना श्रुबसोली (इंग्लंड), मेग लानिंग, मिगान शूट (ऑस्ट्रेलिया), स्टीफनी टेलर (कर्णधार), दिआंद्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), सुनी लुस (दक्षिण आफ्रिका), १२वी खेळाडू : अनाम अमीन (पाकिस्तान).