एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई

अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले होते. पण यावेळी प्रशिक्षकाची निवड करताना कोहलीचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने नियुक्त केलेली कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रशिक्षक निवडीचा अंतिम निर्णय घेणार आहे. ‘‘गेल्या वेळी कोहलीने कुंबळे यांच्यासोबत काम करताना आपल्याला अथवा संघाला अनेक अडचणी येतात, अशी खंत बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. पण नव्या निवड प्रक्रियेत कोणाचेही म्हणणे ग्राह्य़ धरले जाणार नाही. कपिल देव यांची समिती कोहलीचे म्हणणे ऐकून घेणार नाही,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. साधारणपणे आपल्याला सोयीस्कर म्हणून मुख्य प्रशिक्षकच सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती करत असतो. पण यावेळी सहाय्यक प्रशिक्षकांआधी मुख्य प्रशिक्षकाची निवड झाली तर त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. अन्यथा निवड समितीने निवडलेल्या सहाय्यक प्रशिक्षकांसोबत त्याला काम करावे लागेल.’’ १५ सप्टेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधीच मुख्य प्रशिक्षकांसह सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचे बीसीसीआयचे ध्येय आहे.