दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी घेतली तरी ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार भारताचा कर्णधार विराट कोहलीने बोलून दाखवला. शुक्रवारी होणाऱ्या सहाव्या आणि अंतिम लढतीमध्ये काही बदल करताना राखीव क्रिकेटपटूंना संधी देणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

‘‘मालिकेत विजयी आघाडी घेतल्याचा निश्चितच आनंद आहे. मालिका खिशात घातली तरी अद्याप काय सुधारणा करता येईल, याचा आम्ही विचार करू. ४-१ हा फरक चांगला असला तरी ५-१ अशा फरकाने जिंकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. शेवटच्या लढतीमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. राखीव खेळाडूंना संधी देण्यासह विजयी आघाडी वाढवण्याला आमचे प्राधान्य राहील,’’ असे कोहलीने सांगितले.

पाचव्या लढतीत मंगळवारी यजमानांचा ७३ धावांनी पराभव करताना भारताने ४-१ अशी विजयी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेत कुठल्याही प्रकारात मालिका जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने अचूक मारा केला तरी सांघिक कामगिरीमुळे विजय मिळाला, असे भारताच्या कर्णधाराचे मत आहे. तो म्हणाला, ‘‘आणखी एका सामन्यात सांघिक कामगिरी उंचावल्याने समाधान वाटले. एकदिवसीय मालिका गमावल्याने दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखाली आहे. जोहान्सबर्गमधील तिसऱ्या कसोटीनंतर आम्हाला सातत्य राखण्यात यश आले. सांघिक कामगिरी बहरल्याने आम्हाला ऐतिहासिक कामगिरी करता आली.’’

कॅगिसो रबाडाला दंड

रोहित शर्माला बाद केल्यानंतर आक्षेपार्ह हातवारे केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.

परदेशातील सवरेत्कृष्ट कामगिरी  -रोहित

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय हा भारताचा परदेशभूमीवरील सर्वात मोठा मालिका विजय असल्याचे उपकर्णधार रोहित शर्माने सांगितले.
  • ‘‘माझ्या मते, भारताची आजवरची परदेशातील ही सवरेत्कृष्ट कामगिरी आहे. द्विपक्षीय मालिका असल्याने मालिका विजयाचे मोठे महत्त्व आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी २००७-०८मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सीबी तिरंगी मालिका जिंकली होती. दोन्ही मालिकांची तुलना होऊ शकत नाही. ती मालिका खूप चुरशीची झाली. उलट विद्यमान मालिकेत आम्ही कमालीचे सातत्य राखले,’’ असे रोहित म्हणाला.
  • पहिल्या चार सामन्यांत मिळून केवळ ४० धावा करता आल्याने रोहित टीकेचे लक्ष्य बनला होता. मात्र मंगळवारी तडाखेबंद शतकी खेळी करताना त्याने विजयात मोलाचे योगदान दिले. सुरुवातीच्या लढतींमध्ये धावा करता न आल्याने व्यथित झालो नव्हतो, असे रोहितने सांगितले.
  • ‘‘केवळ तीन सामन्यांत मी एकेरी धावा काढून बाद झालो. याचा अर्थ माझा सूर हरवला, असे होत नाही. खराब कामगिरीमुळे मी निराश झालो नव्हतो आणि मोठी खेळी करू शकतो, हे मला ठाऊक होते,’’ असे रोहित म्हणाला.

भारताविरुद्धच्या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले -गिब्सन

भारताविरुद्धच्या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले, असे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी म्हटले आहे. ‘‘मी पराभवासाठी कुठलेही कारण सांगणार नाही. तसे प्रत्येक क्रिकेटपटूला मी बजावले आहे. मात्र एखाद्या संघातून तीन अनुभवी फलंदाज वगळल्यानंतर काय अवस्था होईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. आमचे लक्ष्य आगामी विश्वचषक स्पर्धेवर आहे. मात्र आता दिसतो त्यापेक्षा वेगळा संघ त्यावेळी पाहायला मिळेल,’’ असे गिब्सन म्हणाले.