भारताचा कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ताणाचे कौशल्याने व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे.

आयपीएलला २३ मार्चपासून प्रारंभ होत असून, त्यानंतर ३० मेपासून विश्वचषक स्पध्रेसाठी भारतीय क्रिकेट संघाला सज्ज व्हायचे आहे. लीगमधील संघापेक्षा राष्ट्रीय संघ महत्त्वाचा असल्याने अनेक क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी पाठवताना कडक भूमिका घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि निर्णायक एकदिवसीय सामना ३५ धावांनी गमावल्यामुळे भारताने एकदिवसीय मालिका २-३ अशा फरकाने गमावली. त्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘क्रिकेट सामन्यांच्या ताणाकडे गांभीर्याने पाहून खेळाडूंना विश्रांती दिली जाते. विश्वचषक स्पर्धा चार वर्षांतून एकदा येते, परंतु आम्ही आयपीएल प्रत्येक वर्षी खेळतो. आयपीएलशी आमची बांधिलकी नाही, असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु या ताणाचा समतोल साधण्याची गरज असते.’’

‘‘जबाबदारीचे आझे हे खेळाडूंवर असते. कुणालाही मनाविरुद्ध खेळण्याचे दडपण नसते. कोणत्याही खेळाडूला विश्वचषक स्पध्रेला मुकायची इच्छा नाही, तसेच आपल्या दुखापतीमुळे संघाचा योग्य समतोल बिघडावा, असे वाटत नाही,’’ असे कोहली यावेळी म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यामुळे २०१५नंतर भारताने प्रथमच मायदेशात एकदिवसीय मालिका गमावली. यासंदर्भात कोहली म्हणाला, ‘‘या पराभवामुळे मार्गदर्शक खचलेले नाहीत. कारण या तीन सामन्यांमध्ये आम्ही काही प्रयोग केले. दडपणाखाली खेळताना प्रतिस्पर्धी संघाने अधिक स्फूर्तीने खेळ उंचावला. कठीण प्रसंगांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अप्रतिम खेळला. त्यामुळे विजयाचे श्रेय त्यांच्या खेळाला जाते.’’

विश्वचषकासाठी फक्त एकच बदल!

भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषकाच्या दृष्टीने उत्तम समतोल साधला गेला आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पध्रेसाठी फक्त एकमेव बदल अपेक्षित आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले.

‘‘अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे संघात पुनरागमन होईल. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींचा उत्तम पर्याय उपलब्ध असेल. संघाचा समतोल साधण्यासाठी काय आवश्यक आहे, हे आम्हाला कळले आहे. भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ सज्ज आहे. विश्वचषकासाठी जाताना कठीण प्रसंगांमध्ये उत्तम निर्णय घेता यावे, याकरिता हे पर्याय हाताळले जात आहेत,’’ असे कोहलीने सांगितले.

प्रयोग फसले आणि..

बऱ्याचशा प्रयोगांमुळे २-० अशा आघाडीनंतर भारताने मालिका गमावली. यासंदर्भात कोहली म्हणाला, ‘‘ज्यांना खेळायची संधी मिळाली, त्यांच्याकडून जबाबदारी आणि दडपण हाताळण्याची आमची अपेक्षा होती. मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्यामुळे या खेळाडूंना जबाबदारीने खेळण्याची संधी देण्यात आली. हे प्रयोग कधी यशस्वी होतात, तर कधी फसतात. परंतु तुम्ही प्रयत्नपूर्वक हे प्रयोग केलेच नाहीत, तर तुम्हाला कळणारच नाही.’’