आयपीएलचे यंदाचे पर्व आमच्यासाठी फारच वाईट गेले असे म्हणता येणार नाही. उत्तरार्धात बेंगळूरु संघाने काही प्रमाणात चांगली कामगिरी केल्याचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

बेंगळूरुने यंदाच्या पर्वातील प्रारंभीचे सहा सामने गमावले. मात्र, त्यानंतरच्या आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकल्याने त्यांनी स्पर्धेअखेर ११ गुण मिळवले आहेत. ‘‘प्रारंभीचे सहा सामने गमावल्यानंतर आयपीएलसारख्या स्पर्धेत पुनरागमन करणे खूपच अवघड असते. मात्र, या पर्वातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले,’’ असे कोहलीने हैदराबादविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले. ‘‘क्रिकेटचा हा सगळ्यात लहान प्रकार अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा आहे. सामन्याची अवघी ५ ते ७ मिनिटे संपूर्ण चित्र पालटवू शकतात. शिमरॉन हेटमायर आणि गुरकिरतसिंग मान यांनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. दोघेही अशा प्रकारच्या खेळी करू शकतात, याची खात्री होती. आता पुढील वर्षी दोघेही प्रारंभापासूनच लयीत खेळतील, अशी अपेक्षा आहे. पर्वाच्या प्रारंभी आम्ही पराभूत होत असतानादेखील संघव्यवस्थापनाने परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली. तसेच संघाच्या चाहत्यांनीदेखील आमचा उत्साह कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली. दरवर्षी आम्हाला चाहत्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढच होत आहे. त्याबद्दल आम्ही चाहत्यांचे आभारी आहोत. पुढील वर्षी आम्ही आमची कामगिरी नक्कीच उंचावू,’’ असेही कोहलीने नमूद केले.