भारतीय संघाचा कप्तान व धडाकेबाज फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 21 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

वेस्ट इंडिजविरूद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरने 39 सामन्यांमध्ये 52.73च्या सरासरीनं 1573 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकांचा व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम सचिनच्या नावावर आहे. विराट कोहलीनं विंडिजविरोधात 27 एक दिवसीय सामन्यांमध्ये 60.30 च्या सरासरीनं 1387 धावा केल्या आहेत. आता त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या 187 धावांची गरज असून त्याचा धडाका बघता पाच सामन्यांमध्ये तो 187 धावा नक्कीच करेल अशी अपेक्षा आहे.

विंडिजविरोधात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये राहूल द्रविड तिसऱ्या स्थानावर आहे. द्रविडनं 40 सामन्यांमध्ये 42.12 च्या सरासरीनं 1348 धावा केल्या असून यामध्ये तीन शतकं व आठ अर्धशतकांचा समावेश आहे. तर 27 सामन्यांमध्ये 1142 धावा करणारा सौरभ गांगुली चौथ्या स्थानावर आहे. विंडिजविरोधात एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा सचिन, विराट, राहूल व सौरभ या केवळ चार भारतीय फलंदाजांना पार करता आलेला आहे.