मोहालीत बुधवारी भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा सात विकेटनं पराभव केला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दमदार ७२ धावांची खेळी केली. विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ७२ धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधील सरासरी ५० पार गेली आहे. तिन्ही प्रकारच्य क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट कोहली एकमेक फलंदाज आहे. त्याच्या आसपास एकही फलंदाज नाही.

विराट कोहलीची टी-२० मधील सरासरी ५०.८५ झाली आहे. तर एकदिवसीयमध्ये ६०.३१ आणि कसोटमध्ये ५३.१४ सरासरीने विराटने धावा केल्या आहेत. कोहलीनं केलेल्या या विक्रमाच्या जवळ सध्याच्या घडीला कोणीच नाही. अशी कामगिरी करणारा कोहली जगातला एकमेव फलंदाज आहे.

विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये ७९ सामन्यांत ५३.२४ च्या सरासरीनं ६७४९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात विराटने २३९ डावांत ६०.३१ च्या सरासरीनं ११५२० धावा, तर टी-२०च्या ७१ सामन्यांत ५०.८५ च्या सरासरीनं २४४१ धावा आहेत. विराट कोहलीला टी-२० मध्ये अद्याप एकही शतक झळकावता आले नाही.

कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मोहालीच्या मैदानावरील या विजयामुळे भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विराटने या सामन्यात नाबाद ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.