करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात क्रिकेट सामने बंद आहेत. मात्र यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसी पुन्हा क्रिकेट स्पर्धा सुरु करता येतील का याची चाचपणी करत आहे. अनेक खेळाडूंना या काळात आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं आहे. तरीही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या काळात घर बसल्या ३ कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावली आहे. लॉकडाउन काळात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची नाव नुकतीच जाहीर करण्यात आली. ज्यात विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू असून त्याने या यादीत सहावा क्रमांक पटकावला आहे. १२ मार्च ते १४ मे या काळात विराटने इन्स्टाग्रामवर विविध बँडच्या पोस्ट टाकत ३.६ कोटी कमावले आहेत.

लॉकडाउन काळात इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. रोनाल्डोने लॉकडाउन काळात तब्बल १७.९ कोटींची कमाई केली आहे. रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर २२ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डोच अव्वल आहे.

रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आणि अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीही या काळात कमाईमध्ये चांगलाच आघाडीवर आहे. मेस्सीने या काळात १२.३ तर ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमारने अवघ्या ४ पोस्ट करत ११ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याव्यतिरीक्त या यादीत एनबीए स्टार शकील ओ’नील, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम हे खेळाडूही आहेत. कोहलीने या काळात ३ ब्रँडच्या पोस्ट केल्या असून त्याने प्रत्येक पोस्टसाठी १.२ कोटी रुपये घेतले आहेत.