भारताचा कर्णधार विराट कोहलीची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : मलाही अपयशामुळे त्रास होतो. कॅमेऱ्यासमोर हे निदर्शनास येत नसले तरी, अपयशामुळे मीही खचतो, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून मिळालेला पराभव कोहलीला पचनी पडण्यास फार वेळ लागला. ‘‘हो, सर्वसामान्यांप्रमाणेच माझ्यावरही अपयशाचा परिणाम होतो. परंतु संघाला माझी गरज असल्याने मी भावनांचे जाहीर प्रदर्शन केले नाही. त्याउलट त्या निराशेतून स्वत:ला सावरून मी संघातील अन्य खेळाडूंनाही न्यूझीलंडविरुद्धच्या त्या पराभवाला विसरण्यास सहाय्य केले,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘मला पराभूत होणे कधीच आवडत नाही. जेव्हाही मी खेळपट्टीवर उतरतो, तेव्हा संघासाठी शक्य तितके योगदान द्यायचाच प्रयत्न करतो. कारण माघारी परतताना कोणत्याही गोष्टीची खंत माझ्या मनात राहता कामा नये. आम्हाला भारतीय क्रिकेटमध्ये एक वारसा निर्माण करायचा आहे, ज्यातून प्रेरणा घेत भविष्यातील खेळाडूही आमच्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील,’’ असेही ३१ वर्षीय कोहलीने सांगितले.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला ६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.