माजी कर्णधार सौरव गांगुलीची सूचना

कोलकाता : प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेत कोहलीच्या मताचा विचार व्हावा, असे भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी अनुकूलता दर्शवली होती. परंतु प्रशिक्षकाच्या निवडीसंदर्भात अद्याप कुणीही माझ्याशी चर्चा केली नाही, असे विराटने म्हटले होते. यासंदर्भात गांगुली म्हणाला की, ‘‘विराट हा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला मतप्रदर्शनाचा अधिकार आहे.’’

गांगुलीचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने २०१७ मध्ये मुख्य प्रशिक्षकपदावर शास्त्री यांची नेमणूक केली होती. सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे समितीवरील अन्य सदस्य होते. आता नव्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

कोणाचेही मत विचारात न घेता तटस्थपणे निवड करू -गायकवाड

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नियुक्ती करताना आम्ही तटस्थ राहू. याप्रकरणी आम्ही कोणाचेही मत विचारात न घेता निष्पक्षपणे निवड करू, अशी प्रतिक्रिया क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केली.

भारताच्या प्रशिक्षक निवडीसाठी नेमण्यात आलेल्या कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समितीत गायकवाडव्यतिरिक्त शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. ‘‘गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाविषयी विराट कोहली अथवा अन्य कोणी काय बोलते आहे, याविषयी फार चर्चा रंगते आहे. परंतु आम्ही कोणाचाही विचार न करता तटस्थपणे प्रशिक्षकाची निवड करू. याचप्रमाणे महिलांच्या संघासाठी निवड करतानाही आम्ही सर्व वादविवादांवर पडदा टाकून डब्ल्यू. व्ही. रामण यांची निवड केली,’’ असे गायकवाड यांनी सांगितले.