भारताचा कर्णधार विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज आहे. आव्हानांचा पाठलाग करण्याची वेळ येते, तेव्हा विराट हा सचिनपेक्षाही उत्कृष्ट ठरतो, असे मत आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. बंगळुरू संघासाठी विराट आणि एबी दोघांनी अनेकदा दमदार खेळी केली आहे. त्यांनी एकत्रितपणे भागीदारी करूनही संघाला चांगली धावसंख्या गाठून दिलेली आहे. दोघांच्या खेळीत फरक आहे, पण दोघांपैकी एकाची निवड करणे कठीण आहे. तरीही चेन्नई सुपर किंग्जच्या एका अनुभवी फिरकीपटूने यात एकाची निवड केली आहे.

“गोलंदाजांचा सामना करण्याची आम्हा दोघांची पद्धत वेगवेगळी आहे. मला वैयक्तिकरित्या थोडं लवकर आक्रमण करायला आवडतं. माझ्यातील उणिवा दिसू नयेत यासाठी तो प्लॅन असतो. म्हणूनच मी आल्यापासून फटकेबाजी करत असतो. मला ५ षटकं जरी खेळून दिली, तरी समोरच्या संघापुढे धावांचा डोंगर उभा राहिल अशी भावना गोलंदाजांमध्ये मी खेळताना निर्माण व्हायला हवी असे मला वाटते”, असे डिव्हिलियर्सने स्वत:च्या खेळाचे वर्णन केले होते.

“विराट हा एक विश्वासार्ह फलंदाज आहे. आपण २०पैकी १५ षटके फलंदाजी करावी अशी त्याची नेहमी इच्छा असते. मी खेळ पटकन बदलण्याच्या दृष्टीने खेळत असतो. एखाद्या इंजेक्शनप्रमाणे मला खेळाची दिशा बदलायला आवडते, पण विराट त्याच्या पद्धतीने खेळ करत राहतो. म्हणूनच विराट माझ्यापेक्षाही भरवशाचा फलंदाज आहे”, असा फरक डिव्हिलियर्सने सांगितला होता.

CSKचा अनुभवी फिरकीपटू इमरान ताहीर याने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला विराट की डिव्हिलियर्स अशी निवड करायला सांगितले. त्याबाबत बोलताना ताहिरने आपला दक्षिण आफ्रिकन संघाचा कर्णधार डिव्हिलियर्स याची निवड केली. IPL 2019मध्ये ताहिर पर्पल कॅप विजेता होता. त्याने स्पर्धेत सर्वाधिक २६ बळी टिपले होते.