लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या काळात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आता सोशल मीडियावर एकमेकांशी संपर्कात राहून गप्पा मारत आहेत. आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल यांना आपण इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करताना पाहिलं आहे. भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहलने नुकत्याच इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. शांत स्वभावाच्या मोहम्मद शमीला यावेळी चहलने एक अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला.

विराट की रोहित, तुझा सर्वात चांगला मित्र कोण?? असा प्रश्न विचारल्यानंतर शमीनेही मनापासून विराटचं नाव घेतलं. “माझं आणि रोहितचं फोनवर फारसं बोलणं होत नाही. मी त्याच्याशी कधी मस्करीही करत नाही, खरं पहायला गेलं तर रोहित आणि मी एकाच कसोटी सामन्यात पदार्पण केलं आहे. विराट आणि माझी मजा-मस्करी सुरु असते. त्यामुळे मी विराटचं नाव घेईन, तो संघाचा कर्णधार आहे म्हणून मी त्याचं नाव घेतोय असं नाही..पण त्याचं आणि माझं बाँडींग जास्त आहे.”

दरम्यान, करोनामुळे सध्या देशभरातली परिस्थिती आणि वाढलेलं लॉकडाउन लक्षात घेता बीसीसीआयने तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता एप्रिल-मे महिन्याच्या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. ESPNCricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ३ मे नंतर केंद्र सरकार लॉकाडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे पाहिल्यानंतर स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बीसीसीआय आपली अधिकृत बाजू मांडेल. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास पुढील वर्षात आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. २९ मार्च ते २४ मे या कालखंडात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं.