भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आजपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या दिवशीच हा सामना संपला. हा सामना अत्यंत रंगतदार झाला. १९४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र कर्णधार विराट कोहली याने एकट्याने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या.

इंग्लंडमध्ये पुढे अजूनही ४ कसोटी सामने होणार आहेत आणि त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळण्यासाठी जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्टेलियातील आजी आणि माजी क्रिकेटपटू यांच्यात कोहली या विषयवार द्वंद्व रंगल्याचे दिसत आहे. कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक ठोकू देणार नाही, अशी दर्पोक्ती करून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला काही दिवस झाले असतानाच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली याने कमिन्सचे दात घशात घातले होते. विराट केवळ एकच नाही, तर अनेक शतके ठोकेल, असा विश्वास ब्रेट ली याने व्यक्त केला होता. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यानेही ब्रेट लीच्या सुरात सूर मिसळला आहे.

सध्याच्या घडीला विराट कोहली हा कसोटीतील तांत्रिकदृष्टया सर्वोत्तम खेळाडू आहे, अशी स्तुतीसुमने स्टीव्ह वॉ याने उधळली आहेत. तो म्हणाला की कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेत सामन्यात टिकून राहणे हा कोहलीचा स्वभाव आहे. त्याच्याकडे झुंजार खेळ करण्याचे सामर्थ्य आहे. कोहली आणि डिव्हिलियर्स हे दोन खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये तांत्रिकदृष्टया सर्वोत्तम आहेत, असे माझे मत आहे. आता डिव्हिलियर्स याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे सध्या कोहली हाच सर्वोत्तम कसोटीपटू आहे, असे तो म्हणाला.