जागतिक नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळविणारा नेमबाज रंजन सोधी याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली आहे, तर अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटपटू विराट कोहली, जागतिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची शिफारस करण्यात आली आहे.
सोधी याने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतील डबलट्रॅपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवित सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी केली होती. हे पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. माजी जागतिक बिलियर्ड्स विजेते मायकेल फरेरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी पंधरा खेळाडूंची शिफारस केली आहे. २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडीत कांस्यपदक मिळविणारा रेंजित माहेश्वरी, युवा गोल्फपटू गगनजित भुल्लर यांचा या खेळाडूंमध्ये समावेश आहे.
सोधी या ३३ वर्षीय खेळाडूला २००९ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली तर सलग तिसऱ्या वर्षी नेमबाजास हा सन्मान मिळेल. २०११ मध्ये गगन नारंग तर २०१२ मध्ये विजयकुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले असून विजयकुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविले आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस खेळाडूंमध्ये कविता चहाल या एकमेव बॉक्सरचा समावेश आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेले खेळाडू
विराट कोहली (क्रिकेट), चक्रवोलु स्वुरो (तिरंदाजी), रेंजित माहेश्वरी (अ‍ॅथलेटिक्स), पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन), कविता चहाल (बॉक्सिंग), रुपेश शहा (स्नूकर), गगनजित भुल्लर (गोल्फ), सबा अंजुम (हॉकी), राजकुमारी राठोड (नेमबाजी), ज्योस्त्ना चिनप्पा (स्क्व्ॉश), मौमा दास (टेबल टेनिस), नेहा राठी (कुस्ती), धर्मेद्र दलाल (कुस्ती), अभिजीत गुप्ता (बुद्धिबळ), अमितकुमार सरोहा (पॅरा स्पोर्ट्स)