देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी राहुल द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांची ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी आम्ही द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. आम्ही सरकारला वेगवेगळया विभागांमध्ये नामांकने पाठवली आहेत असे ते म्हणाले. बीसीसीआयने दुसऱ्यांदा खेल रत्न पुरस्कारासाठी कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. याआधी २०१६ मध्ये बीसीसीआयने कोहलीची शिफारस केली होती.

पण ते ऑलिम्पिक वर्ष असल्याने पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या तिघींना तो पुरस्कार देण्यात आला. २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात.