विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेला दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३६ व्या वर्षी स्टेनने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही आफ्रिकन गोलंदाजाला स्टेनसारखी कामगिरी करुन दाखवता आली नव्हती. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली, तरीही आपण वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणार असल्याचेही स्टेनने स्पष्ट केले आहे.

आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला डेल स्टेन गेली अनेक वर्षे आफ्रिका क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा मानला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये दुखापतीने त्याला ग्रासले होते. त्यामुळे बराच काळ मैदानाबाहेर होता. स्टेनने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्णधार विराट कोहली आणि डेल स्टेन दोघेही IPL मध्ये बंगळुरू संघाकडून खेळतात. त्यामुळे या दोघांमध्ये चांगले ऋणानुबंध आहेत. त्यामुळे विराटने स्टेनला खास शुभेच्छा दिल्या आहेत. “तू या खेळाचा खरा चॅम्पियन आहेस. निवृत्तीनंतरचे तुझे आयुष्य अधिक छान जावो”, असे ट्विट त्याने केले.

दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेनने ९३ कसोटी सामने खेळले. स्टेनच्या नावावर कसोटीमध्ये ४३९ बळी जमा आहेत. आपल्याला दिलेल्या संधीबद्दल स्टेनने आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे आणि सदैव पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. “वाढतं वय लक्षात घेता कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणं आता मला शक्य होणार नाही. त्यामुळे मी योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतोय. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी मी सदैव उपलब्ध असणार आहे”, असे स्टेनने पत्रकारांशी बोलताना सांगितले.