टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) ट्वेन्टी-२० प्रकारातील सर्वोत्तम फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. भारतीय संघाने नुकतिच इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका २-१ ने जिंकली. टीम इंडियाला याचा फायदा सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांच्या यादीत देखील झाला आहे. आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांच्या यादीत टीम इंडियाच्या स्थानात सुधारणा झाली आहे. टीम इंडियाला सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांच्या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे.

 

सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या कोहली आणि दुसरे स्थान मिळालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच यांच्यात तब्बल २८ गुणांचा फरक आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मेक्सवेल याला तिसरे स्थान मिळाले आहे. कोहलीचा पराक्रम म्हणजे तो एकदिवसीय, ट्वेन्टी आणि कसोटी या तिनही प्रकारात सर्वोत्तम फलंदाजाच्या यादीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहली ट्वेन्टी-२० मध्ये पहिल्या, कसोटीमध्ये दुसऱया आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱया स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट जसप्रित बुमराह याला आपले दुसरे स्थान टिकवण्यात यश आले आहे, तर रविचंद्रन अश्विन ८ व्या स्थानावर आहे. क्रमवारीत द.आफ्रिकेचा अव्वल गोलंदाज इमरान ताहिर हा बुमराहच्या केवळ चार गुणांनी आघाडीवर आहे.
इंग्लंडच्या जो रुट आणि भारताचा युवा फिरकीपटू यझुवेंद्र चहल यांनीही या मालिकेमध्ये चांगल्या कामगिरीची नोंद केली होती. दोघांच्याही क्रमवारीत चांगली सुधारणा झाली. जो रुट भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा केलेला फलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा होऊन तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर लोकेश राहुलच्या क्रमवारीत तब्बल १५ स्थानांची सुधारणा होऊन क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात २५ धावांमध्ये सहा विकेट्स घेणारा चहलला क्रमवारीत ८६ व्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. याआधी तो ९२ व्या स्थानावर होता.