भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतच्या एका खास चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी कोहलीने आयुष्यातील काही मजेदार किस्से शेअर करताना क्रिकेटच्या मैदानातील काही आठवणींनाही उजाळा दिला. आमिरसोबतच्या शोमध्ये त्याने २०११ च्या विश्वचषकातील आठवणी सांगितल्या. विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात लसिथ मलिंगाच्या यॉर्करची भीती वाटत होती, अशी कबुली त्याने दिली आहे. या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या घडीला आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. मात्र २०११ मध्ये विराट कोहलीला एक वेगळी अशी ओळख नव्हती. भारतीय मैदानात आयोजित ५० षटकांच्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईच्या वानखडेच्या मैदानावर अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात मलिंगाच्या गोलंदाजीची भीती वाटत होती, असे विराटने आमिरला सांगितले.

अंतिम सामन्यात सलामीवीर सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली खेळायला आला होता. सामन्याबद्दल विराट म्हणाला की, दोन गडी बाद झाल्यामुळे संघासोबत माझ्यावरही दडपण आले होते. मलिंगा यॉर्कर टाकेल, याची भीती होती. पण काही चेंडू खेळल्यानंतर मी मैदानात स्थिरावलो. या सामन्यात विराट कोहलीने गौतम गंभीरसोबत ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. यात त्याने ३५ धावांचे योगदान होते. गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेला पराभूत करत भारताने तब्बल २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता.

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli revealed his fear of facing lasith malinga during 2011 world cup final
First published on: 05-10-2017 at 20:45 IST