13 December 2017

News Flash

कोहलीला झटपट तंदुरुस्त करण्यात ‘या’ व्यक्तीची ‘विराट’ मेहनत

खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 1:37 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली

दुखापतीमुळे आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये न खेळलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहली आता जबरदस्त फलंदाजी करताना दिसतो आहे. दोन शानदार अर्धशतके झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजी पाहून त्याला दुखापत झाली होती, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे. विराट कोहलीने त्याच्या दुखापतीवर मात करत पुन्हा दमदार फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. खुद्द विराट कोहलीनेच त्याच्या दुखापतीमध्ये वेगाने झालेल्या सुनावणीचे रहस्य उलगडले आहे.

बंगळुरुच्या संघात लवकरात लवकर परतण्यासाठी विराट कोहलीने प्रचंड मेहनत घेतली. विराट कोहलीच्या तंदुरुस्तीमागे ट्रेनर शंकर बासू यांचा मोठा वाटा आहे. विराट कोहलीला कायम तंदुरुस्त ठेवण्यात शंकर बासू यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. दोन वर्षांपासून शंकर बासू विराट कोहलीच्या तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवत आहेत. त्यामुळेच शंकर बासू यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शंकर बासू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे सपोर्ट स्टाफ आहेत. या फोटोमध्ये शंकर बासू यांच्यासोबतच संघाचे फिजिओ इवान स्पिचलेदेखील आहेत. इन्स्टाग्रामवरील फोटोखालील शीर्षकात कोहलीने शंकर बासू यांचा उल्लेख सुपर ट्रेनर असा केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळत असताना विराट कोहलीला दुखापत झाली होती. सीमारेषेवर चेंडू अडवताना विराट कोहलीचा खांदा दुखावला होता. यामुळे विराट कोहली चौथ्या आणि अंतिम कसोटीत खेळला नव्हता. या दुखापतीनंतर आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे कोहलीने म्हटले होते. अखेर १४ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट कोहली यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळला.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बंगळुरुचा संघ अडखळताना दिसला. कोहलीच्या अनुपस्थितीत बंगळुरुने चारपैकी तीन सामने गमावले. मात्र आता विराट कोहली संघात दाखल झाल्याने बंगळुरुची फलंदाजी मजबूत झाली आहे. तगड्या फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत वरचा क्रमांक मिळवण्याचा बंगळुरु संघाचा मानस आहे.

First Published on April 21, 2017 1:37 pm

Web Title: virat kohli reveals the reason behind his quick recovery after shoulder injury