कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाची सुत्र विराटच्या हाती आली, विराटनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय संघावर पकड बसवली आहे. सध्याच्या घडीला अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी विराट कोहली हा एक आदर्श खेळाडू आहे. मात्र विराट कोहलीसाठी त्याच्या आयुष्यात त्याचे वडिल हेच सुपरहिरो आहेत. एका कार्यक्रमात बोलत असताना विराटने आपल्या वडिलांविषयीच्या आठवणी जागवल्या.

“माझ्या क्रिकेटमधल्या कारकिर्दीसंदर्भात बाबांनी जे निर्णय घेतले, म्हणूनच मी आज इथपर्यंत प्रवास करु शकलो. माझ्यासाठी तेच माझे सुपरहिरो आहेत. आयुष्यात अनेक लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळत असते, बाबांनी नेहमी मला क्रिकेटला प्रथम महत्व दे असं सांगितलं होतं. यामुळे लहानपणापासूनच माझं क्रिकेट आणि सरावावरुन लक्ष विचलीत झालं नाही. त्यामुळे यापुढेही आयुष्यात मी केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावरच पुढे जाईन.” विराट एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

बाबांचं व्यक्तिमत्व खूप आश्वासक होतं. त्यांच्या निर्णयावर ते नेहमी ठाम असायचे. त्यांना पाहूनच मी कधीही सबबी द्यायच्या नाही हे ठरवून टाकलं होतं. यानंतरच क्रिकेटमध्ये मला माझा मार्ग सापडत गेल्याचं विराट कोहली म्हणाला. नुकतीच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने जिंकली. यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ज्यामध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून पुनरागमन करणार आहे.