विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात ४ बाद २४ अशी केविलवाणी अवस्था असताना संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनीला फलंदाजीला पाठवण्याऐवजी हार्दिक आणि पंत या युवांवर का जबाबदारी सोपवली, असा प्रश्न कोहलीला विचारण्यात आला. परंतु कोहलीने शांतपणे धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्यामागचे कारण स्पष्ट केले. ‘विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच आम्ही धोनीला एक विशिष्ट भूमिका सोपवलेली होती. सुरुवातीच्या १५-२० षटकांत चार-पाच बळी गेल्यावर धोनी अखेपर्यंत उभा राहून संघाला तारू शकतो, हे आपल्या सर्वानाच माहित आहे. त्यामुळे आजही ठरल्याप्रमाणेच त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. जर शेवटची काही षटके शिल्लक असती तर कदाचित त्याला वरच्या स्थानावरही पाठवले असते. परंतु आजच्या सामन्यात धोनीने सातव्या स्थानावर फलंदाजी करणेच योग्य होते,’ असे कोहली म्हणाला.

वैयक्तिक कामगिरी अजून सुधारता आली असती!

कोहलीने यंदाच्या विश्वचषकात पाच अर्धशतके झळकावली. परंतु उपांत्य सामन्यात तो अवघा एक धावेवर माघारी परतला. स्वत: कोहलीही त्याच्या कामगिरीवर नाखूष आहे. ‘‘खरे सांगायचे तर माझ्या क्षमतेनुसार मी या स्पर्धेत धावा केल्या नाहीत, हे मान्य करावे लागेल. कदाचित दोन सामन्यांत मला शतक झळकावण्याची संधी होती, परंतु मी ती गमावली.’’